
आमच्याविषयी
बालकांच्या मनोरंजनासाठी व प्रबोधनासाठी जे काही रंगमंचावर सादर होते ते बालरंगभूमीच्या व्याख्येत येते. नृत्य – नाट्य – गायन – वादन या रंगमंचीय कलांसोबत लहान मुलांना रमवणारे बाहुल्यांचे खेळ, जादूचे खेळ, शॅडो प्ले, जगलरी इ. खेळ बालरंगभूमीच्या कक्षेत येतात.
शिक्षण हा बालकांचा अधिकार आहे आणि कलाशिक्षण बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाची गरज आहे. मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या रंगमंचीय कलेचा, खेळांचा प्रचार आणि प्रसार हे बालरंगभूमी परिषदेचे मुख्य उद्दिष्ट असेल.
बालरंगभूमीशी संबंधित सर्व संस्था, कलावंत, बालकलाकार व बालप्रेक्षकांच्या हितासाठी ‘बालरंगभूमी परिषदेची’ स्थापना झाली आहे. मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्य प्रत्येक मुलांपर्यंत पोहचवण्याचे कार्य बालरंगभूमी परिषद करणार आहे.
विविध योजना/उपक्रम
१) बालनाट्य लेखन प्रोत्साहन पुरस्कार योजना
२) बालप्रेक्षक/बालकलाकार सभासद योजना
३) बालनाट्य संमेलन (प्रस्तावित) डिसेंबर २०२४
४) चित्र व शिल्प प्रदर्शन (प्रस्तावित) नोव्हेंबर २०२४
वर्तमान शाखा - एकूण २५
मुंबई विभाग : मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल.
कोकण विभाग : रत्नागिरी, रायगड
पुणे विभाग : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, मंगळवेढा
मराठवाडा विभाग : औरंगाबाद, बीड, परभणी, नगर, लातूर
विदर्भ विभाग : अकोला, अमरावती, नागपूर
खान्देश विभाग : नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव
एकूण सभासद संख्या : ३००० (प्रत्येक जिल्ह्यातील नामवंत बालनाट्य संस्था, संगीत/नृत्य संस्था यांचे संचालक, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ परिषदेचे सभासद व पदसिध्द अधिकारी आहेत.
बालरंगभूमी क्षेत्रातील समस्या व उपाययोजना
१) ठाणे, मुंबई मधील नाट्यगृहांचे बालनाट्यासाठी असलेली भाडे दरवाढ कमी करुन घेणे.
२) बालनाट्य प्रयोगांसाठी रविवार, सुट्टीचे वार मिळविण्यासाठी सफल प्रयत्न करणे.
३) बालनाट्यासाठी ‘सरकारी अनुदान’ मिळविणे.
४) नव्या शैक्षणिक धोरणात अंतर्भाव असलेल्या ‘कला शिक्षणाची’ अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाला व शालेय संस्थांना मदत देवू करणे.
५) प्रत्येक जिल्ह्यात बालरंगभूमीचे कार्यक्रम सादर करण्यासाठी नाट्यगृहाची अल्पदरात व्यवस्था प्राप्त करुन घेणे.
६) नाट्यशिक्षण, गायन – वादन आणि नृत्य शिक्षणाचे वर्ग – सुविधा नाही अशा गावात, शहरात देणे.
७) राज्य बालनाट्य स्पर्धेसंबंधी आलेल्या तक्रारी समस्या सांस्कृतिक विभागाकडे पोहचवून ह्या स्पर्धेची लोकप्रियता टिकवून ठेवण्यास राज्य शासनाला सहकार्य करणे.
लोकप्रियता / जनाधार
बालरंगभूमी परिषदेने पहिल्या पाच वर्षात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम आयोजित करुन पुरेशी ओळख जनप्रियता व लोकप्रियता संपादन केली आहे. वृत्तपत्र व मिडीयाने वेळोवेळी परिषदेच्या कार्याची दखल घेत भरपूर प्रसिध्दी बहाल केली आहे. शाखांचे फेसबुक पेजेस साक्षी आहेत.
बालरंगभूमी परिषद
स्थापना : बालरंगभूमी परिषदेची स्थापना जून २०१८ दिवशी झाली
नोंदणी : संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये महाराष्ट्र राज्य मुंबई क्रमांक १६/९/२०१८ GBBSD दिनांक २६/०७/२०१८
पत्रव्यवहाराचा पत्ता : यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटूंगा, माहीम, मुंबई ४०००१६
ईमेल : [email protected]
संस्था विशेष : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेशी संलग्न
अध्यक्षांचे मनोगत

नमस्कार !
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे.तसेच बालरंगभूमी ही प्रत्येक बालकाची गरज आहे. मनोरंजनातून प्रबोधन करणारी बालरंगभूमी ही बालमनावर संस्कार करते. बालकांचे व्यक्तिमत्त्व घडवते. मुलांच्या मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी मंचावरून जे जे सादर होते… ती बालरंगभूमी!
बालरंगभूमीची ही सोपी, सुटसुटीत व्याख्या स्वीकारून “बालरंगभूमी परिषदेची” स्थापना जुलै २०१८ मध्ये झाली. बालरंगभूमी परिषदेला ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची’ मान्यता मिळून त्या संस्थेशी संलग्न राहण्याचा संकल्प बालरंगभूमी परिषदेच्या घटनेत आहे. बालरंगभूमी परिषद ही नाटय परिषद प्रमाणे फक्त नाटय क्षेत्राशी संबंधित नसून, नृत्य, गायन, वादन, जादू इत्यादी कला प्रकारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी कटिबध्द आहे.
बालरंगभूमी परिषद स्थापना झाल्यावर पहिल्या पाच वर्षात जिल्हावार शाखा स्थापन करून परिषदेच्या विस्ताराचे कार्य प्रामुख्याने झाले. आज २३ शाखा कार्यरत आहेत आणि पाच शाखा लवकरच कार्यरत होतील. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि शहरात बालनाट्य, गायन, वादन, संगीत आणि नृत्याशी संबंधित अनेक संस्था कार्य करत असतात.”बालरंगभूमी परिषद” या संस्थांच्या मदतीसाठी “शीर्ष संस्था” म्हणून कार्य करणार आहे. मुलांचा आणि त्यांच्यातील कलागुणांचा विकास होण्यासाठी विविध कला महोत्सवाचे आयोजन परिषद करत आहे.
ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात “लोककला महोत्सव साजरा केला जाईल. ऑक्टोबर महिन्यात “विशेष मुलांच्या कला प्रदर्शनाचा” उत्सव होईल. नोव्हेंबरमध्ये १०० व्यां नाटय संमेलनात बालरंगभूमी परिषदेचे विविध कार्यक्रम संमेलनाची शान आणि शोभा वाढवतील. जानेवारी महिन्यात “बालनाट्य महोत्सव” साजरा करून बालनाट्य चळवळीची पाळेमुळे अधिक घट्ट करून ती ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यात येतील. याच महोत्सवातील सर्वोत्तम बालनाट्यांचे ५० प्रयोग बाल प्रेक्षकांसाठी राज्यातील विविध ठिकाणी करण्यात येतील.
अनेक नामवंत रंगकर्मी आणि ख्यातनाम संस्थांचे दिग्गज संस्था चालक बालरंगभूमी परिषदेचे आजीव सभासद आहेत. या सोबत बाल प्रेक्षक/ बाल कलाकार सभासद योजना यशस्वीपणे राबवून येत्या वर्षात एक लाख बालकांना या संस्थेचे सभासद करून घेण्याचा मानस आहे.
कोणतीही संस्था मोठी होण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते.आजवर देणग्या, जाहिराती, स्पॉन्सरशिप यांच्या साहाय्याने कार्यरत असणारी ही परिषद आर्थिकरित्या सुदृढ होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सुदैवाने कॉर्पोरेट क्षेत्रातून परिषदेला आर्थिक मदत मिळण्याचे मार्ग आज सुकर होत आहेत. सत्तेचा आणि सरकारचा वरदहस्त ज्या संस्थेवर असतो ती संस्था अधिक जोमाने, वेगाने आपले उद्दिष्ट गाठू शकते. बालरंगभूमी परिषदेचे कार्य सरकार दरबारी पोहचवून सरकारी योजनांची फळे आपल्या पदरी पडावीत यासाठी मी आणि माझे कार्यकारी मंडळ प्रयत्नशील आहोत.
बालरंगभूमी परिषदेला अजून बरेच काम करायचे आहे.संस्थेची स्वतःची वास्तू उभारण्याचे स्वप्न देखील पुढील काळात साध्य करू. जेणेकरून तिथे शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन भावी कला शिक्षकांची पिढी तयार करता येईल आणि ही कला शिक्षकांची फौज कला विषयांचे नवे शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यासाठी शालेय शिक्षण संस्थांना मदतीस येईल.
बालरंगभूमी परिषदेच्या कार्याला आपलाही हातभार लागावा असे आपणाला वाटत असेल तर आपण आमच्यासोबत येऊ शकता. तुम्ही रंगकर्मी असाल, बालरंगभूमीशी संबंधित असाल तर आमच्या परिषदेत स्वागत आहे. दानशूर मंडळींना आवाहन आहे की त्यांनी आर्थिक भार हलका करण्यासाठी आवश्यक देणगी द्यावी.
शालेय शिक्षण संस्था, नृत्य नाट्य आणि संगीत क्षेत्रातील सर्वांना आवाहन करतो की बालरंगभूमी परिषदेसोबत या आणि देशाचे भवितव्य घडविणाऱ्या पुढील पिढीतील बालकांची सांस्कृतिक जडण घडण अधिक चांगल्या रीतीने करण्यासाठी बालरंगभूमी परिषदेला मदत करा.
ॲड.नीलम शिर्के सामंत
अध्यक्ष
बालरंगभूमी परिषद